बाणेर : बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील पासपोर्ट कार्यालयासमोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाजगी कंपनीतील वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
महाबळेश्वर हॉटेल चौक परिसरामध्ये मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तसेच बाणेर व पाषाण यांना जोडणारा एकमेव रस्ता असलेल्या बाणेर पाषाण लिंक रोड वरील अरुंद जागेमध्ये चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यात येत आहे. यामुळे पासपोर्ट कार्यालयासमोरील एक लेन वाहतुकीसाठी कमी होत असून यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
व्यापारी संकुल असलेल्या 45 आयकन या खाजगी इमारतीमधील पार्किंग रिकामी असताना या परिसरातील कर्मचारी रस्त्यांवर वाहने लावत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने 45 आयकॉन मधील पार्किंग मध्ये पासपोर्ट कार्यालयासमोरील वाहने लावण्यात यावीत तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
























