औंध : हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी व नागरी समस्या सोडवण्यासाठी पीएमआरडीएतर्फे ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गेल्या महिनाभरात १९ किमीपर्यंतची अतिक्रमणे हटवत रस्ते रुंदीकरण सुरू झाले असून, लक्ष्मी चौक, मारुंजी, माणगाव, पांडवनगर आदी महत्त्वाच्या रस्त्यांच्या विस्तार व पर्यायी मार्गांची आखणी करण्यात आली आहे.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या कामांमुळे हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
























