लोकप्रतिनिधीला येणारी धमकी ही गंभीर बाब – खा. सुप्रिया सुळे

नवी दिल्ली- खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना आणखी एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने ‘मी तुला सिद्धू मूसेवाला सारखा मारेन’ असा मेसेज केला होता. यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

‘जर तू दिल्लीत सापडलास तर तुला AK47 ने उडवून देईन, सिद्धू मूसेवालासारखा मर्डर केस होईल’, अशी उघड धमकी संजय राऊत यांना मेसेजमध्ये देण्यात आली आहे. ‘सलमान आणि तू फिक्स आहेस’, असे लिहित लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तो मजकूर संदेश म्हणून प्राप्त झाला आहे. या धमकीभऱ्या संदेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, संसदेतील आमचे सहकारी आणि महत्त्वाचे नेते संजयजी राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे.

See also  पुणे कॅन्टोंमेंटमध्ये टपाली मतदानाला सुरुवात