पुणे: पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकांची घोषणा झाली असून, ही निवडणूक केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसून शहर व परिसराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. वेगाने शहरीकरण होत असलेल्या बाणेर बालेवाडी, सुस महाळुंगे, पाषाण आणि सुतारवाडी (प्रभाग ९) परिसरात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक मूलभूत प्रश्न आज अधिक तीव्रतेने समोर येत आहेत.
पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्ते व पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि हरित क्षेत्रांचे संवर्धन यासोबतच वाढते वायू, ध्वनी व बांधकामजन्य प्रदूषण, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि एकूणच जीवनमान या मुद्द्यांकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. आज ठरवली जाणारी प्राधान्यक्रमे, अपेक्षा आणि धोरणेच या संपूर्ण परिसराचे उद्याचे स्वरूप निश्चित करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर Baner Balewadi Pashan Residents Association (BBPRA) आणि Baner Balewadi Nagrik Manch (BBNM) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग ९ मधील नागरिकांच्या सहभागातून “नागरिकांचा जाहीरनामा” तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. हा जाहीरनामा कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून, पूर्णतः नागरिककेंद्रित असेल. सामान्य नागरिकांचे अनुभव, समस्या, गरजा, उपाययोजना आणि भविष्यासाठीची दृष्टी यांचा समावेश यात करण्यात येणार आहे. पुढील काळात निवडणूक लढवणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसमोर नागरिकांच्या अपेक्षा स्पष्टपणे मांडणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रक्रियेत बाणेर बालेवाडी, सुस महाळुंगे, पाषाण आणि सुतारवाडी, येथील अधिकाधिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, आपले प्रश्न, सूचना आणि दृष्टिकोन मोकळेपणाने Google Form तसेच इमेल च्या माध्यमातून मांडावेत, असे आवाहन (BBNM) आणि (BBPRA) या आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी नागरिकांच्या गटांशी संवाद साधण्याचे देखील प्रयोजन करण्यात आले आहे. व्यापक सहभागातून तयार होणारा जाहीरनामा हा प्रभाग ९ च्या शाश्वत, समतोल आणि नागरिकाभिमुख विकासासाठी एक ठोस मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Google form Link : https://forms.gle/khWb4azvNa78AkCm9
Email : bbnmpune@gmail.com
Baner Balewadi Pashan Residents Association (BBPRA) – 9226422975
Baner Balewadi Nagrik Manch (BBNM) – 9823933399 | 9422067393
























