पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. बैठका, स्नेहमेळावे आणि प्रचार फेऱ्यांमुळे निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच, यंदा पारंपरिक प्रचाराच्या चौकटीपलीकडे जाणारा एक सामाजिक-आध्यात्मिक उपक्रम विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून लहू बालवडकर यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या ‘चैतन्यस्पर्श’ या अध्यात्मिक उपक्रमाने प्रभागात वेगळी आणि सकारात्मक ओळख निर्माण केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चैतन्यस्पर्श पादुकादर्शन’ या भव्य सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमात देशातील १२ संत, महंत व शक्तिपीठांच्या पादुकांचे विधीवत अभिषेक-पूजन करण्यात येते. त्याचबरोबर महाप्रसादाचे आयोजनही केले जाते. बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी परिसरातील हजारो भाविक या सोहळ्यात श्रद्धेने सहभागी होतात.
निवडणूक प्रचारापुरते मर्यादित न राहता सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि सामाजिक-आध्यात्मिक उपक्रमांच्या माध्यमातून लहू बालवडकर यांनी प्रभागात स्वतंत्र आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केल्याचे चित्र दिसून येते. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधताना अनेक ठिकाणी ‘चैतन्यस्पर्श’ या उपक्रमाची आपसूक चर्चा होत असल्याचेही आढळून येते.
लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘चैतन्यस्पर्श पादुकादर्शन’ सोहळा दरवर्षी भक्तिभावपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडतो. या सोहळ्यातील महाप्रसादाला पुणेकरांचा प्रतिसाद विशेष उल्लेखनीय ठरत असून, सुमारे ३० हजारांहून अधिक भाविक पादुकादर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात. एका छताखाली हजारो भाविकांनी शिस्तबद्धपणे प्रसाद ग्रहण करताना दाखवलेली एकजूट, सेवा आणि समरसता हे या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरते.
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत लहू बालवडकर यांनी प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या सातही गावांमध्ये सलग दहा दिवसांचा गावभेट दौरा केला. या दौऱ्यात रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, नागरी सुविधा यांसारख्या समस्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या चर्चांदरम्यान सामाजिक उपक्रमांमुळे निर्माण झालेल्या विश्वासाचा वारंवार उल्लेख होत असल्याचेही चित्र समोर आले.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या अंतर्गत पातळीवर प्रभाग क्रमांक ९ संदर्भात विविध पर्यायांचा आढावा सुरू आहे. स्थानिक पातळीवर सक्रिय, सातत्यपूर्ण जनसंपर्क राखणारे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणारे चेहरे पक्षाच्या विचाराधीन असून, त्यामध्ये लहू बालवडकर यांच्यासह काही नावे चर्चेत असल्याचे समजते. सभा-बैठका आणि घोषणांच्या पलीकडे जाऊन सामाजिक, आरोग्यविषयक आणि अध्यात्मिक उपक्रमांतून निर्माण झालेली सकारात्मक प्रतिमा प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
























