महाळुंगे : पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज म्हाळुंगे गावांत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हाळुंगेवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदयात्रेचा शुभारंभ झाला. म्हाळुंगे गावाच्या विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी टोकाचे आग्रही असून, सर्वानुमते तो लवकरच मंजूर होईल, असा विश्वास ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक ठिकाणी भरभरुन समर्थन मिळत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भैरवनाथांच्या आशीर्वाद घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. या रॅलीचा शुभारंभ ना. पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयूरी कोकाटे, भाजपचे निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शरद भोते, राकेश पाडाळे, विनायक चिवे, शांताराम पाडाळे, यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा चौफेर विकास, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गतिमान आणि सर्वसमावेशक कार्यपद्धती; मतदारांचा भरभरुन आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पार्टीने अनेक निवडणुकीत आजवर यश मिळवले आहे. २०१७-२०२१ काळात पुणे महापालिका क्षेत्रात अनेक प्रकल्प उभे राहिले. मेट्रो, नदीसुधार, समानपाणी पुरवठा असे एक ना अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याने पुण्याचे चित्र आज बदलले आहे.
ते पुढे म्हणाले की, म्हाळुंगे गावच्या विकास आराखड्यासाठी टोकाचे आग्रही असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच, नागरिकांच्या मतांचा देखील यात समावेश करावा, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वानुमते हा विकास आराखडा मंजूर होईल, आणि गावचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ना. पाटील पुढे म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत एकूण ४२ जणांना उमेदवारी नाकारावी लागली. पण कोणतीही तक्रार न करता, पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत. प्रल्हाद सायकर यांच्या पत्नी स्वप्नाली सायकर विद्यमान नगरसेविका होत्या, त्यांनाही उमेदवारी देता आली नाही. पण कोणतीही तक्रार न करता स्वप्नालीताई आणि प्रल्हाद सायकर पक्षाचा आदेश मान्य करुन काम करत आहेत. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. पण नाईलाजाने त्यांनाही उमेदवारी नाकारावी लागली. ते कार्यकर्ते देखील आज भाजप उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत.
प्रभाग क्रमांक ९ मधून नव्या कर्तृत्ववान नेतृत्वाला संधी देण्यासाठी, एका व्यक्तीला उमेदवारी नाकारावी लागल्यानंतर, आभाळ कोसळल्याप्रमाणे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय देवेंद्रजींवरही टीका टिप्पणी करत आहेत. वास्तविक, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रहित सर्वप्रथम असते. देशाला सामर्थ्यवान, सुरक्षित, समृद्ध बनवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते झटत असतात. त्यामुळे अन्य पक्षांपेक्षा भाजपा हा म्हणूनच वेगळा पक्ष आहे. तेव्हा विरोधकांना पराभवाची जाणीव झाली असल्याने आज ते टीका टिप्पणी करत आहेत. प्रभाग क्रमांक ९ मधून लहू बालवडकर हे महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
























