सुसगाव येथील सनी वर्ल्ड परिसरातील रस्ता कामावर संशयाची छाया; पारदर्शक टेंडर प्रक्रियेची मागणी

पुणे : सुसगाव येथील सनी वर्ल्ड जवळील खिंडीतील उतार कमी करण्याच्या प्रस्तावित कामावर सध्या संशयाची छाया निर्माण झाली असून, हे काम पारदर्शक टेंडर प्रक्रियेद्वारे देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांसह राजकीय वर्तुळातून होत आहे.

गेल्या अनेक आठवड्यांपासून सुसखिंड परिसरातील रस्त्याचा चढ कमी करण्याचे काम रखडलेले आहे. यासाठी महानगरपालिकेकडे कलम 67 (3) अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, सनी वर्ल्ड परिसरातील धोकादायक उतार कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. तसेच, खुल्या टेंडर प्रक्रियेद्वारे निविदा मागवून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या संबंधित रस्ता प्रत्यक्षात खोदकामही सुरू झालेले नाही. त्यामुळे कोणतीही तातडीची (इमर्जन्सी) परिस्थिती नसताना टेंडर प्रक्रिया न राबवता काम देण्यामागचे कारण काय, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

तसेच, कलम 67 (3) अंतर्गत रस्ता कामाची मागणी ही काही ठराविक ठेकेदारांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी केली जात आहे का, याचाही तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.

See also  मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग