पिंपरी : निगडी प्राधिकरण येथील भरतमुनी रंगघन या इंटिमेट थिएटरमध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सादर करण्यात आलेल्या ‘मिर्झा’ या नाटकाने प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात नेले. इतिहास, विचार आणि भावनांचा संगम घडवणाऱ्या या नाट्यप्रयोगाने उपस्थित प्रेक्षकांवर खोल ठसा उमटवला.
‘मिर्झा’ हे नाटक संपल्यानंतरही त्याचा प्रभाव मात्र दीर्घकाळ मनात राहतो. पडदा पडतो, पण विचारांची हालचाल थांबत नाही. इतिहास केवळ सांगितला जात नाही, तर तो जिवंत होतो आणि प्रेक्षक त्या अनुभवाचा एक भाग बनतो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
नाटकातील संवाद अत्यंत धारदार असून प्रत्येक वाक्य मनाला भिडणारे आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ किंवा वि. ह. औंधकर यांच्या ‘बेबंदशाही’ या नाटकांची आठवण करून देणारी लेखनशैली या नाटकात जाणवते. दोन हिंदू राजे एकत्र आले असते तर काय घडले असते, या विचाराला भिडणारी मांडणी प्रेक्षकांना खडबडून जागे करते.
नाटकात डॉ. सुचेत गवई यांनी साकारलेले छत्रपतींचे पात्र प्रभावी ठरले. त्यांच्या आवाजातील ठामपणा, नजरेतील ज्वाला आणि अभिनयातील आत्मविश्वासामुळे प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. त्यांनी भूमिका साकारली नसून ती जगली, अशीच भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली.तर माधव जोगळेकर यांनी साकारलेले मिर्झा राजे जयसिंग यांचे पात्र शांत, गंभीर आणि अंतर्मुख भासते. त्यांच्या अभिनयातून निष्ठा आणि अंतर्गत द्वंद्व यांचा सूक्ष्म संघर्ष प्रभावीपणे उभा राहतो. या दोन्ही कलाकारांमधील संवाद म्हणजे जणू शब्दांचे रणांगणच, ज्यात प्रेक्षक श्वास रोखून गुंतून राहतो.
नाटकाची संगीत रचना, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि वेशभूषा यांचा उत्कृष्ट संगम या प्रयोगाला अधिक प्रभावी बनवतो. प्रत्येक घटक प्रेक्षकांना त्या ऐतिहासिक काळात घेऊन जातो, अशी अनुभूती मिळते.
नाट्यप्रयोगाच्या शेवटी “कोण बरोबर, कोण चूक?” हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतो. छत्रपतींचा स्वाभिमान आणि मिर्झा राजे जयसिंगांची निष्ठा यांच्यातील संघर्ष प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. त्यामुळे प्रेक्षक केवळ पाहणारा न राहता विचार करणारा बनतो.आजच्या काळात अशा प्रकारची विचारप्रवर्तक नाट्यकृती दुर्मिळ असल्याचे मतही व्यक्त होत आहे. ‘मिर्झा’ हे केवळ नाटक नसून एक अनुभव, एक आरसा आहे, ज्यामध्ये प्रत्येकाला स्वतःकडे पाहण्याची संधी मिळते. म्हणूनच या नाटकाचा अनुभव प्रत्येकाने किमान एकदा तरी घ्यावा, असे आवाहन रंगप्रेमींनी केले आहे.















