मुंबई : विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि अध्यापकांना संवेदनशील व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘मानससूत्र – विद्यार्थी मानसिक आरोग्य व कल्याण’ या तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यक्रमाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीए चे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि एमएसएफडीए चे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री पाटील म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक, वेगवान आणि बदलत्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी केवळ अभ्यासाच्या ताणाखाली नाहीत, तर सामाजिक अपेक्षा, डिजिटल माध्यमांचा प्रभाव आणि भावनिक एकाकीपण यांसारख्या विविध समस्यांनाही सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
‘मानससूत्र’ उपक्रम केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून शिक्षकांच्या संवेदनशीलतेला नवी दिशा देणारा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमधील मानसिक तणावाची लक्षणे ओळखणे, आत्महत्येच्या प्रवृत्तीची प्रारंभिक चिन्हे समजून घेणे, समुपदेशन आणि मार्गदर्शन करणे तसेच आवश्यकतेनुसार योग्य रेफरल प्रणाली विकसित करणे या बाबींवर या प्रशिक्षणामध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संकटपरिस्थितीत तत्काळ आणि संवेदनशील प्रतिसाद देण्यासाठी अध्यापकांना सक्षम करण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांतील अध्यापकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होईल तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्वास्थ्याबाबत सजगता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.















