मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि. ८ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळे
1) https://results.digilocker.gov.in
2) https://mahahsscboard.in
3) https://sscresult.mkcl.org
4) https://results.targetpublications.org
5) https://results.navneet.com
6) https://www.tv9marathi.com आणि
7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc–10-results
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
















