पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BVJNIOT), पुणे येथे भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात संस्थेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य अमित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी प्राचार्य आर. एस. देशमुख यांनी मार्गदर्शन करताना योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून आरोग्यपूर्ण जीवनशैली असल्याचे सांगितले. संस्थेमध्ये हा उपक्रम दरवर्षी साजरा केला जात असून प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. संगीता लाड आणि कारंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धनुरासन, ताडासन, वृक्षासन, पश्चिमोत्तानासन, पवनमुक्तासन आणि नौकासन यांसारख्या विविध योगासनांचा सराव करण्यात आला. या आसनांमुळे शरीराची लवचिकता, शक्ती आणि संतुलन वाढण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले.
तसेच प्राणायाम सत्रामध्ये कपालभाती, अनुलोम-विलोम आणि ओंकार जपाचा सराव करण्यात आला. श्वासोच्छ्वासाच्या या तंत्रांमुळे मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या योग सत्राचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समन्वयक प्रा. विद्या खोबरे यांनी केले. कार्यक्रमात प्राचार्य आर. एस. देशमुख, उपप्राचार्य अमित पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमामुळे संस्थेतील सदस्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून योगाद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याने या कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
















