पुणे : कोथरूड येथील प्रस्तावित SRA प्रकल्पामध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकल्पाची सखोल चौकशी करून योजना रद्द करावी, तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) पुणे यांच्याकडे अखिल भारतीय मराठा महासंघा कडून करण्यात आली आहे.
वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे या प्रकरणात सरकारी जागा लाटणे, नियमबाह्य प्रक्रिया राबविणे तसेच शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीमध्ये चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित SRA योजनेची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास योजना रद्द करावी, तसेच संबंधित अधिकारी, बिल्डर व दोषी व्यक्तींवर फसवणूक, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शासनाच्या मालमत्तेचे व नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. यामध्ये अमर पवार, अनिल मारणे, हिरामण धनकवडे, राकेश गायकवाड व अनिकेत भगत, अतिश शेडगे यांचा समावेश होता. या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
















