कोथरूड – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा केला गेला. भारतीय वायु दलातील निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट श्री. शंतनू नारके हे या उत्सवास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या उपकार्याध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी, लेखा विभागप्रमुख श्रीमती शीतल दंडवते, वास्तु व्यवस्था प्रमुख श्री. श्रीपाद कुलकर्णी, महिलाश्रम वसतिगृहाच्या संचालिका श्रीमती सुमन तांबे इ. मान्यवरांनी संस्थेच्या वतीने श्री. शंतनू नारके यांचे स्वागत केले.
यावेळी झालेल्या औपचारिक सभेत बोलताना श्री. शंतनू नारके यांनी प्रथम महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. ‘भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला येता आले, हा माझा सन्मान आहे’ असे ते या प्रसंगी म्हणाले. आपल्या बोलण्यात त्यांनी एन. सी. सी. व आर. एस. पी. पथकांच्या देखण्या ‘रूट मार्च’ चे विशेष कौतुक केले. संरक्षण सेवेत भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करणाऱ्या श्री. नारके यांनी वायुदलातील आपली कारकीर्द यावेळी विद्यार्थिनींपुढे उलगडून दाखवली. ‘संरक्षण क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढण्याची आवश्यकता असून त्या द्वारे खरे महिला सक्षमीकरण साधले जाईल’ असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले आणि यासाठी संस्थेतील विद्यार्थिनींना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
श्रीमती विद्या कुलकर्णी यांनीदेखील आपल्या भाषणात सर्व मुलींचे कौतुक केले आणि केवळ एक दिवसापुरते देशभक्तीचे प्रदर्शन न करता आपल्या दैनंदिन व्यवहारातून आपले राष्ट्रीय कर्तव्य सदैव बजावण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाच्या श्रीमती सविता रानडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती शुभांगी तांबट यांनी केले.