बालेवाडी : बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अरुंद झालेल्या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने विशेषतः सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
बालेवाडी हाय स्ट्रीट हा परिसर नागरिक तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे कायम गजबजलेला असतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी राहत असल्याने वाहनांसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होते. परिणामी समोरासमोर वाहने आल्यास वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी निर्माण होते. पार्क केलेल्या वाहनांमुळे काही ठिकाणी पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असून आपत्कालीन वाहनांनाही मार्ग मिळण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या दुभाजकालगत पार्किंग होत असल्याने रस्त्याच्या मधोमध होत असलेले पार्किंग ही मोठी समस्या निर्माण होत आहे.
यापूर्वीही बालेवाडी हाय स्ट्रीटवरील पार्किंगच्या समस्येवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नो-पार्किंग क्षेत्रात दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्याचे प्रकार तसेच पार्किंगच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते.दरम्यान, बाणेर-बालेवाडी परिसरात वाढती वाहतूक, हॅफझार्ड पार्किंग आणि रस्त्यावरील कोंडी याबाबत नागरिकांकडून सातत्याने उपाययोजनांची मागणी होत आहे.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी बालेवाडी हाय स्ट्रीटवरील पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारे अनधिकृत पार्किंग थांबवावे, आवश्यक ठिकाणी नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करावे तसेच उपलब्ध पार्किंगची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

















