पुणे : सार्वजनिक उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांमध्ये महिलांना अधिकाराची पदे आणि निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान दिल्यास उत्सवांच्या आयोजनात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये महिलांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढल्यास ध्वनीप्रदूषण नियंत्रण, पर्यावरणाचे रक्षण, उत्सवांचे पावित्र्य आणि सार्वजनिक सभ्यता यांसारख्या विषयांना अधिक प्राधान्य मिळेल. सामाजिक बांधिलकी जपत उत्सव अधिक सर्वसमावेशक आणि लोकप्रिय करण्यासाठी महिलांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असेही खर्डेकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स यांच्या वतीने शहरातील विविध सार्वजनिक मंडळांना उपयुक्त साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमादरम्यान ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी नवरात्रोत्सवात महिलांचा वाढता सहभाग अधोरेखित केला. भोंडला, देवीची मिरवणूक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत महिला उत्तम नियोजन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ आर. के. अकॅडमी भजनी मंडळाला स्पीकर भेट देण्यात आला. यावेळी मीनाक्षी भेगडे, उज्ज्वला भिगे (इंदापूरकर), शैला थिटे, माधवी जोशी आणि संजीवनी इनामदार उपस्थित होत्या.
छत्रपती संभाजी मित्र मंडळ, भालेकर चाळ येथे साहित्य भेट देताना संतोषभाऊ लांडे, मनीषाताई जोरी, संगीताताई दुधाणे, शकुंतला साबळे, आशाताई यादव, सुशीला लोहकरे, पुष्पा झोरे, बायाबाई अनिवसे, पुष्पा वाळंज, ज्योती कराळे, गौरी जोरी यांच्यासह ओंकार खरात, देवदत्त जोरी, शाश्वत जोरी, विराज चंदनशिवे, आशुतोष पवळे, मयूर खरात आणि श्रवण जोरी उपस्थित होते. प्लॉट क्रमांक १५, खिलारेवाडी नदीपात्र येथील नवरंग नवरात्रोत्सव मंडळाला कपाट भेट देण्यात आले. यावेळी सूरज अभंगे, वृंदा अभंगे, अनिकेत मछले, पुष्पा तामचीकर आणि सुधा अभंगे उपस्थित होते.
अखिल सदाशिव पेठ नवरात्रोत्सव मंडळालाही स्पीकर आणि कपाट भेट देण्यात आले. यावेळी प्रकाशराव गायकवाड, अनिलराव यनपुरे, हर्षद शेलार, राहुल पायगुडे आणि सौरभ गायकवाड उपस्थित होते.
फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने विविध सामाजिक संस्थांना सातत्याने उपयुक्त वस्तूंचे वाटप केले जाते. विशेषतः दिव्यांग केंद्रे, वृद्धाश्रम आणि विशेष मुलांच्या संस्थांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या उपक्रमाचे उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
















