मारुंजी येथील रास्तभाव दुकानातील विविध सेवांचा शुभारंभ
रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणार- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

पुणे : रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना माफक दरात अन्नधान्य वितरित केले जाते. यापुढे या दुकानांच्या माध्यमातून नागरिकांशी निगडीत जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जातील, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

मारुंजी ता. मुळशी येथील प्रकाश बुचडे यांच्या रास्तभाव दुकानात नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध सेवांचा शुभारंभ मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार योगेश टिळेकर, पीएमआरडीए चे आयुक्त राहूल महिवाल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, तहसीलदार रणजीत भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, रास्त भाव दुकानदारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. यातून एक नवीन व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करून रास्त भाव दुकानदारांनी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शासनाच्या विविध उपक्रमात सहभाग घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

श्री. कुलकर्णी म्हणाले, शिधा पत्रिकासोबत आधार जोडणी मध्ये पुणे विभागाचे चांगले काम झाले आहे. रास्त भाव दुकानदारांनी नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात.

‘प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस’ (पीएम-वाणी), आपले सरकार केंद्र, पोस्टल बँक, नोगा उत्पादने विक्री केंद्र व गॅस सुविधा केंद्र अशा सुविधा रास्त भाव दुकानातून नागरिकांना मिळणार आहेत.

See also  केंद्रीय तपास यंत्रणांना सुप्रीम कोर्टाची चपराक; आम आदमी चा विजय