पुणे : शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जी- २० अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, समन्वयक राजेश पांडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कृती आधारित शिक्षण पद्धतीद्वारे मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध शैक्षणिक साधने आणि शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांचा समावेश आहे. आदर्श बालवाडी, ५५ भाषांतील पुस्तके, आयुकाद्वारे निर्मित ४० विज्ञान प्रयोगांची माहिती देणारी ‘द वेलो ग्यानेश्वरी’ सायकल, खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व, कौशल्य अभ्यासक्रम, भारतीय पारंपरिक खेळ, पूर्व प्राथमिकसाठी डिजिटल अभ्यासक्रम, वाचन, गणन व लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी खेळणी, प्रात्यक्षिके, कोडी, सामान्यज्ञान, प्रश्नमंजूषा, गोष्टी, कविता, डिजिटल साहित्य आदीची रेलचेल प्रदर्शनात आहे.
पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाबरोबर मुलांचा गणिती व वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य शिक्षण, आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित व्हाव्यात यासाठी शैक्षणिक साहित्य येथे उपलब्ध आहे. भारतीय ज्ञान परंपरेबरोबर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचा प्रदर्शनात समावेश आहे. प्रदर्शनात शिक्षणसंस्था, उत्पादक, स्टार्टअप आदींची सुमारे १०८ दालने असून २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. यापैकी ३६ राज्यांची दालनेदेखील आहेत.
प्रदर्शनात सहभागी प्रमुख संस्था
युनिसेफ, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी), एनसीईआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय नॉलेज सिस्टम्स् डिव्हिजन (आयकेएस), मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयुका, आयसर, विविध स्टार्ट अप यांच्यासह विविध राज्य शासनांचे शिक्षण विभाग अशा एकूण १०८ प्रदर्शन दालनांचा प्रदर्शनात सहभाग आहे.
प्रदर्शनाचे महत्व:
पायाभूत क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक विकास, बौद्धिक व कौशल्य वृद्धी यासह लेखन, वाचन व गणन या प्रक्रिया सोप्या पद्धतीने शिकण्यासाठीची कौशल्ये येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित होण्यासाठी या प्रदर्शनातील बाबी सहाय्यभूत ठरणार आहेत.