महिला स्वयंसहायता समूहांनी शहरी बाजारपेठात आपली ओळख निर्माण करावी- जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

उमेद अभियानामार्फत ‘खरेदीदार-विक्रेते’ यांचे संमेलन संपन्न
पुणे, दि. ३ : ग्रामीण भागात स्थापन झालेल्या स्वयंसहायता समूहानी स्वत:च्या आर्थिक उन्नतीसाठी शहरी बाजारपेठात प्रवेश करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, प्रशासन यासाठी समुहांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करुन देईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केले.

महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्यादृष्टीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अल्प बचत भवन पुणे येथे गुरुवारी (२ नोव्हेंबर) आयोजित ‘खरेदीदार विक्रेते’ यांच्या एकदिवसीय संमेलनात ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्तालयाचे उप आयुक्त (विकास) विजय मुळीक, उप आयुक्त (आस्थापना) राहुल साकोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सहायक आयुक्त (विकास) सोनली घुले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, राज्य व्यवस्थापक हरेश्वर मगरे आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, स्वयंसहायता समूहाच्या शुद्ध, सात्विक व भेसळमुक्त असणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढत असल्याने आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी त्यांची उत्पादने शहरी बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवावीत.

श्री. मुळीक म्हणाले, खरेदीदार- विक्रेता संमेलन ही एक चांगली संकल्पना आहे. सध्या समाजाला आरोग्यदायी पदार्थांची गरज असून बचत गटांच्या ग्रामीण महिला असे पदार्थ तयार करत आहेत. या संमेलनामुळे महिलांच्या उत्पादनांना आता थेट ग्राहक मिळतील व त्यांच्या व्यवसायात भरारी घ्यायला मोठी मदत होईल.

श्री. वाघमारे म्हणाले, या स्तुत्य उपक्रमातून स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेले उत्पादने सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. खरेदीदार आणि ग्राहकांमार्फत स्वयंसहाय्यता समुहांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल.

श्रीमती कडू यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. जिल्ह्यात एकूण २६ हजार ७२५ महिला स्वयंसहायता समूह असून प्रभागसंघ संस्था ६९ व ग्रामसंघ संस्था १ हजार २०० आहेत. या संस्थांच्या माध्यमातून जवळपास ३ लाख महिला एकत्र आल्या आहेत. या महिला व्यवसायामध्ये उतरल्या असून त्यांना या संमेलनाच्या माध्यमातून थेट खरेदीदार भेटतील. भविष्यात ग्राहकांमार्फत स्वयंसहाय्यता समुहांना वस्तू, सेवांच्या मोठ्या मागण्या मिळतील, असे त्या म्हणाल्या.

संमेलनात महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाच्या खरेदीच्या अनुषंगाने रिलायन्स मार्ट, फॉर्म दिदी, दे-आसरा, गावकी, नारी शक्ती महिला शेतकरी कंपनी यांच्यासह विविध ३० ग्राहक उपस्थित होते. यावेळी ग्राहकांनी स्वयंसहाय्यता समुहांची उत्पादने पाहून त्यांना मागणी आदेश देण्यासाठी व पुढील व्यवहारासाठी चर्चा झाली.

यावेळी स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना खात्रीशीर मार्केट उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने जिल्ह्यात ४२ ठिकाणी स्वयंसहायता समुहांनी ‘पुण्यश्री सुपर मार्केट’ सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सुपर मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांची, पदार्थांची माहिती दर्शविणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका डिजिटल स्वरूपात जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.

यावेळी वेगवेगळ्या संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, खरेदीदार यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नितीन पतंगे, कनिष्ट प्रशासन अधिकारी प्रशांत दीक्षित, जिल्हा व्यवस्थापक सपना करकंडे, सोनाली अवचट, वृषाली मोहिते, आश्रुबा मुंढे, सर्व तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक उपस्थित होते.

See also  औंधमधील रस्ता रुंदीकरणासाठी पोलीस खात्याची जागा मिळणार - आमदार सिद्धार्थ शिरोळे