न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे शनिवारी (दि. 29 जुलै) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,             न्या. उपाध्याय यांचे कुटुंबिय, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवाधिकार आयुक्त न्या. के के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश व वकील उपस्थित होते.

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी न्या. उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीत व राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा जन्म दिनांक 16 जून 1965 रोजी झाला. न्या. उपाध्याय यांनी 1991 मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि 11 मे 1991 रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात नागरी आणि घटनात्मक बाजूने कामकाज पाहिले. दिनांक 21 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांना अतिरिक्त न्यायाधीश पदावर बढती मिळाली आणि 6 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली.

See also  पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा-उपमुख्यमंत्री अजित पवार