अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरीऑनची संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र / वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी कॅरीऑनची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नियामक परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण मान्यताप्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सन२०२३ मधील प्रात्यक्षिक परीक्षा दि. ७ ते १४ मे २०२३ दरम्यान तसेच लेखी परीक्षा दि.१७ मे ते ०६ जुन २०२३ दरम्यान घेण्यात आल्या होत्या या परीक्षेचा निकाल दि. २९ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता.हा निकाल जाहीर झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी तंत्रनिकेतनातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया विलंबाने झाल्यामुळे शैक्षणिक कालावधी कमी मिळाला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम झाला आणि अनेक विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषय राहीले होते. त्यामुळे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावर्षापुरता कॅरीऑन चा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित संस्थेतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा सन २०२३ च्या निकालानुसार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षा नियमावलीतील तरतुदीनुसार पुढील सत्र/वर्षाकरिता प्रवेशास अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये सदर सत्र/वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी हितास्तव एक विशेष बाब म्हणून एक वेळ संधीचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील साधारणत: २२ हजार विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्याकरीता आणि ३६ हजार विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र कर्म पूर्ण करण्याकरीता संधी उपलब्ध होणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. याबाबत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडून परिपत्रक निर्गमीत करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी सदर परिपत्रकानुसार पुढील वर्षाचे सत्रकर्म करणेबाबतची योग्य ती कार्यवाही संस्थेमार्फत करावी.

See also  शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ संपन्न