राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात पुणे विभागातील सर्व कार्यालयांनी सहभाग घ्यावा
–विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :- प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानात विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यालयांनी १०० टक्के सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचा कृती कालावधी २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर असा दीड महिन्याचा आहे. सन २०२३-२४ या वर्षाच्या स्पर्धेसाठी २० ऑगस्ट २०२२ ते १० ऑगस्ट २०२३ हा कालावधी असेल. प्रशासकीय सुधारणेविषयी प्रस्ताव व कल्पना यासाठी कालावधीची अट नाही. कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब, सेवांची गुणवत्ता वाढ व उपक्रमांची परिणामकारकता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नस, संसाधनांचा पर्याप्त व प्रभावी वापर, तंटा, तक्रार मुक्त कार्यालय तसेच नाविन्यपूर्ण व पथदर्थी स्वरुपाच्या संकल्पना आदी बाबींचा पारितोषिक निवडीसाठी विचार करण्यात येईल.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील, तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांची तर महानगरपालिका आयुक्तांनी नागरी संस्थांच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन अभियानाच्या सहभागाबाबत आवाहन करावे. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधींनाही आमंत्रित करावे. या क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय प्रशिक्षण संस्थांमार्फतही अभियानातील सहभाग वाढविण्यावर भर द्यावा. विभागातील सर्व कार्यालयांनी मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहनही श्री. राव यांनी केले आहे.

See also  कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना