सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूकीत बदल

पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागअंतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता काही ठिकाणी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

स्वारगेटकडून वडगाव पूल वीर बाजी पासलकर चौकाकडे येणारी वाहतूक सिंहगड रस्त्याने गणेशमळा सिग्नल येथे डावीकडे वळून जनता वसाहत कॅनॉल रस्त्याने कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) येथे डावीकडे वळवून कॅनॉलच्या उजव्या बाजूने आनंदविहार रस्त्याने तुकाईनगर चौकापर्यंत एकेरी करण्यात आली आहे.

वडगाव पूल (वीर बाजी पासलकर) चौकाकडून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय चौकातून डावीकडे वळून लंडन पूल चौक ते कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) चौकातून डावीकडे वळून विश्रांतीनगर चौकापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येत असून कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) कडून येणारी वाहने (कॅनॉलच्या डाव्या बाजूने) जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

दोन्ही कॅनॉल रस्ते जोडणाऱ्या लंडन पुलावरून हिंगणे ते महादेवनगरकडे जाण्याकरीता चारचाकी वाहनांना बंदी करण्यात येत असून फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे.

जनता वसाहत ते सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय फन टाईम थिएटर पर्यंत कॅनॉल रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

स्वारगेटकडून वडगाव पूलाकडे (वीर बाजी पासलकर चौक) येण्याकरीता व वडगाव पूलाकडून स्वारगेटकडे जाण्याकरीता (कॅनॉल रस्ता) पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने वाहन चालकांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही.

गोयलगंगा चौकाकडून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे जाताना गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँकेपर्यंत (दुभाजक संपेपर्यंत) रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५० मीटर पर्यंत नो पार्किंग क्षेत्र तयार करण्यात येत आहे. गोयलगंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँक ते अमृतगंगा सोसायटी गेट नं. ४ (शोरबा हॉटेल) पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस दुभाजक संपल्यानंतर मनपा प्रस्तावित नाट्यगृह ते अतिथी हॉटेलपर्यंत फक्त चारचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस एच.डी.एफ.सी. बँकेपासून ते सोबा ऑप्टिमा सोसायटीचे गेट (प्रेमाचा चहा शॉप) पर्यंत फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

See also  स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा भाजपात प्रवेश

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून गोयलगंगा चौकाकडे जाताना सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय चौक ते दुभाजक संपेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस १०० मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.

वाहतूक बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात २० ऑगस्ट पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.

नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उप आयुक्त वाहतूक, पुणे शहर विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

तसेच नागरिकांच्या सूचना व हरकती विचारात घेऊन वडगाव ते पाउंजाई माता मंदीर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक चौक ते विण्षू पुरम सोसायटीच्या गेट पर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५० मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्याचे अंतीम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.