शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शहीद दिलीप ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर आणि लहान मुलगा यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, सुनिल कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडिअर राजेश गायकवाड (नि.), उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे(नि.), लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

कारगिल येथे देशसेवा बजावत असताना ३ सप्टेंबर रोजी दिलीप ओझरकर शहीद झाले.

See also  शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न-पणन मंत्री अब्दुल सत्तार