डॉ. नीलम गोऱ्हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तित्व – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाजकार्याने अमीट ठसा उमटवला आहे. त्यांचा जीवनप्रवास राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता मार्गदर्शक आणि सदैव प्रेरणादायी राहील, असे उदगार राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी काढले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, भारतीय महिला सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपला ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्र यामध्ये नेहमीच कायम आघाडीवर राहिला आहे. सामान्य कार्यकर्ती ते उपसभापती असा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ असा जीवन प्रवास आहे. या पुस्तकातून सामाजिक कार्यकर्ती ते राजकीय नेता या प्रवासाची कहाणी शब्दबद्ध करण्यात आली आहे.

देशाच्या प्रगतीसाठी सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे समान योगदान असणे आवश्यक आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 33 टक्के आरक्षण देण्यात आले. आज संसदेत, विधिमंडळ स्थानिक राजकारण यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग वाढला आहे. महिला विविध क्षेत्रांत आपल्या गुणवत्तेवर पुढे येऊन आपली कर्तबागारी सिद्ध करत आहेत. ही अभिमानाची बाब आहे.

नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ग्रामीण,दुर्गम, आदिवासी भागातील महिलासाठी नीलमताईंचे सामजिक कार्य कायमच सुरू असते. त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामांचा आणि अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. त्यांचे कार्य, विचार या पुस्तकातून समाजापुढे आले असून नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीला कळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नीलमताई गोऱ्हे या ध्येयवादी विचारसरणीच्या विचारवंत आहेत. समाजासाठी, महिलांसाठी काय करू शकतो यासाठी सतत प्रयत्नशील असतात.नेहमी मदतीसाठी सहानुभूतीची भावना त्यांची असते.

या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्यांचा स्वभाव देखील आहे जे मनात असते ते स्पष्ट बोलतात. विधान परिषदेच्या उपसभापती या महत्त्वाचे पदावर काम करत असतानाही विधान परिषदेत सर्वांना न्याय देण्याची व मदतीची त्यांची नेहमीच भूमिका असते. देशात महाराष्ट्र हे महिला धोरण आणणारे पहिले राज्य आहे. या धोरणात त्यांनी खूप चांगल्या सूचना केलेल्या आहेत व नवीन तयार होणाऱ्या धोरणाबाबत सातत्याने पाठपुरावा करतात. शिवसेनेच्या इतिहासातली पहिली महिला शिवसेना नेता नीलमताई आहेत. त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. महिला आरक्षण विषय, मराठवाडा विद्यापीठ नामांतर यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा यावेळी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाला, सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना वेळ ही खूप महत्त्वाची असते. वेळ देणे, घेणे आणि ती ठरलेली वेळ पाळणे ही मोठी कसरत असते परंतु लेखिका करुणा गोखले यांनी या पुस्तकांसाठी खुप मेहनत घेऊन वेळेचे नियोजन केले आणि या पुस्तकाचा प्रवास पूर्ण केला.

कोणतेही कार्य आपण सांगितले नाही तर ते कळणार नाही सामजिक दायित्व म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाचा प्रवास आणि अनुभव व्यक्त करून सर्वांचे आभार मानले

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली.

See also  माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मटका अड्ड्यावर धाड टाकून केली कारवाईची मागणी