कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया २०२३’

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या ‘मिस्टर गे वर्ल्ड २०२३’ साठी करणार भारताचे प्रतिनिधित्व
पुणे : कोल्हापूर येथील विशाल पिंजानी यंदाचा ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ ठरला आहे. आता तो २७ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या ‘मिस्टर गे वर्ल्ड २०२३’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशन आणि क्वीरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे गुरुवारी खराडी येथील हॉटेल रँडिसन ब्ल्यू येथे या ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ स्पर्धेचे आयोजन केले होते. केरळच्या अभिषेक जयदीप याने स्पर्धेचे उपविजेते पटकावले.

मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशनचे संस्थापक आणि ‘मिस्टर गे वर्ल्ड इंडिया २०२०’ श्याम कोन्नूर, फॅशन स्टायलिस्ट अँडी बर्वे, फॅशन कोरिओग्राफर चैतन्य गोखले, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी, गुजरात येथील एलजीबीटीक्यू सामाजिक कार्यकर्ता प्रिन्स मानवेंद्र सिंग गोहील, अंकिता मेहरा, स्टँड अप कॉमेडीयन श्वेता मंत्री यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. श्रीराम श्रीधर यांनी संयोजन केले.

या स्पर्धेत विविध राज्यातून २० स्पर्धक सहभागी झाले होते. विविध फेर्‍या यशस्वी होत विशाल व अभिषेक अंतिम फेरीत दाखल झाले होते. दोघांनीही उत्तम सादरीकरण करत, आपली सामाजिक जाणीव व समज दाखवत, एकमेकांना चुरस दिली. विशालने हा किताब जिंकला. यासह विशालला ‘मिस्टर गे महाराष्ट्र’ व अभिषेक याला ‘मिस्टर गे केरळा’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले.

श्याम कोन्नूर म्हणाले, “ही स्पर्धा केवळ ब्युटी पॅजेंट नाही, तर एलजीबीटीक्यू समुदायाला सक्षम करण्यासाठी, सन्मानाने जगण्याची संधी देणारे व्यासपीठ आहे. हे पॅजेंट सकारात्मक बदल घडवून जगण्यातील अडथळे दूर करून या तुच्छतेने पाहिल्या जाणार्‍या समुदायाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. देशाच्या विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी आपली पार्श्वभूमी, अनुभव, आजवरचा प्रवास, प्रेरणा, अनेकांकडून मिळालेली मौल्यवान साथ, समुदायाला सन्मान देण्यासाठी जागृती करण्याचा विचार मांडत परीक्षक व उपस्थितांची मने जिंकली.

विशाल पिंजानी म्हणाले, “व्यवसायाने मी ग्रंथ प्रकाशक व पुस्तक विक्रेता आहे. मला माझ्या कुटुंबाकडून विशेषत माझी बहिण आणि छोटी पुतणी यांच्याकडून यासाठी खूप प्रोत्साहन मिळाले. मात्र समाजात लैंगिक भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जातो. लैंगिक अल्पसंख्याक म्हणजेच समलिंगी अथवा तृतीयपंथी लोकांकडे तुच्छतेने पाहिले जाते. अनेकदा कुटुंबिय, आप्तस्वकीय, मित्रमंडळी पाठिंबा देत नाहीत. भावनिक आधाराचा अभाव, अवमानकारक वागणूक, आमच्यावरील अत्याचार, बलात्कार, खून अशा अनेक समस्या आहेत. आम्हाला सन्मान मिळावा, द्वेषभावना वाट्याला येऊ नये, यासाठी काम करत आहे. आता दक्षिण आफ्रिकेतील ‘मिस्टर गे वर्ल्ड’ साठी तयार करत आहे. अजूनही ७० देशांत समलैंगिकता गुन्हा समजला जातो. ही धारणा बदलण्यासाठी जगभरातील समलैंगिक लोकांशी, संस्थांशी संलग्न होऊन काम करणार आहोत.”

See also  मोदी - शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला : डॉ. कुमार सप्तर्षी ,मोदी लाट ओसरल्याने लोकसभा त्रिशंकु येईल