पाषाण : पाषाण येथील बालाजी मंदिर चौक परिसरात सुरू असलेल्या मटका अड्डा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी धाड टाकून कारवाई करण्याची मागणी करत बंद केला.
पाषाण येथील बालाजी मंदिर चौक परिसरात राजरोसपणे मटका व पाकळी खेळाचा अवैध्य धंदा सुरू होता. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्याने माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांना फोन केला. दरम्यान माजी आमदार मेधा कुलकर्णी व त्यांचे कार्यकर्ते आल्यामुळे मटका अड्ड्यावरील मटका चालक व खेळणारे यांची धावपळ उडाली व तिथून त्यांनी पळ काढला.
भर वस्तीमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांचे दुर्लक्ष होत असून वारंवार कारवाईची मागणी होऊन देखील कारवाई होत नसल्याबाबत यावेळी नागरिकांनी खंत व्यक्त केली. यानंतर दाखल झालेल्या पोलिसांनी मटका अड्ड्यावरील रोख रक्कम, चिठ्ठी चे कागद तसेच अन्य साहित्य ताब्यात घेतले.
बाणेर बालेवाडी परिसरातील तसेच पाषाण सुतारवाडी येथील सुरू असलेले मटक्याचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली. मागील टर्म मध्ये आमदार असताना मेधा कुलकर्णी यांनी मटका अड्ड्यांवर धाड टाकत परिसरातील सर्व मटके अड्डे बंद केले होते. अनेकदा कारवाई होऊन देखील त्याच ठिकाणांवर पुन्हा मटका कसा सुरू होतो याबाबत देखील योग्य कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.