माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे चोखपणे काम करावे- माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर

पुणे : माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी माध्यमांना निवडणूक प्रक्रीयेविषयी माहिती देण्यासोबत दिलेल्या जबाबदाऱ्याप्रमाणे चोखपणे काम करावे, असे आवाहन लोकसभा निवडणूक माध्यम समन्वयक तथा माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी  जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे सद्सय सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे  आणि जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचे माध्यम समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

डॉ. पाटोदकर म्हणाले, लोकसभा निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून निवडणुकीच्या संदर्भात माहिती संकलन करणे, समाजमाध्यमाद्वारे मतदार जनजागृती करणे, पत्रकारांना प्राधिकार पत्र देण्याची कार्यवाही, पेडन्यूज, जाहिरात प्रमाणीकरण आदी कामे करण्यात येतात. पेड न्यूजबाबत संशयास्पद वृत्त अथवा प्रमाणिकरण न केलेल्या जाहीरातीसंदर्भात समन्वयक अधिकाऱ्यांनी तात्काळ समितीला अवगत करावे. 

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीविषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याची प्रसिद्धी करावी. सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या समन्वयाने माध्यम कक्ष स्थापन करावे. माध्यमांना आपापल्या मतदारसंघात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे डॉ. मोघे यांनी सांगितले.

नागरिकांना निवडणूक प्रक्रीयेविषयी माहिती देण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी उपयोग करण्यावर भर द्यावा अशा सूचना देतानाच त्यांनी माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांची कार्ये व जबाबदाऱ्या, त्यांनी करावयाच्या कामकाजाविषयी डॉ.मोघे यांनी माहिती दिली.

See also  छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील खेळणी दुरुस्त शिवसेनेने दिले अनोख्या स्टाईलने पत्र