पुणे महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात वैद्यकीय उपचारांची फी ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा उपलब्ध करवी

पुणे : आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांची भेट घेऊन महापालिकेच्या सर्व दवाखान्यात रुग्णांकडून दवाखाना रोगी औषध फी च्या नावाने जी दहा रुपये फी घेतली जाते ती माफ केली जावी अशी मागणी करण्यात आली.

महापालिकेच्या सुतार हॉस्पिटल या कोथरूड मधील रुग्णालयात नागरिकांची सनद लावली असून त्यामध्ये “इथे मिळणाऱ्या सर्व आरोग्य सेवा उत्तम गुणवत्तेच्या आणि पूर्ण मोफत असतील. औषधे, निदानासाठी केल्या जाणाऱ्या विविध चाचण्या या सर्व सेवांचा यात समावेश आहे” अशाप्रकारे मोफत सेवा देण्याची घोषणा असताना देखील रुग्णांकडून दहा रुपये फी आकारली जात असल्याने, महापालिका त्यांच्याच मोफत उपचार देण्याच्या भूमिकेवर ठाम नसल्याचे दिसून येते असे आम आदमी पक्षाचे मीडिया संयोजक ॲड.अमोल काळे यांनी सांगितले.

महापालिकेने रुग्णांकडून उपचारांच्या करिता दहा रुपये फी घेण्याचा प्रकार म्हणजे दात कोरुन पोट भरण्याचा प्रकार आहे, कारण रुग्णांकडून दहा रुपये घेऊन महापालिकेचा कुठलाही खर्च वसूल होत नाही परंतु ते दहा रुपये भरून केस पेपर घेताना रुग्णांना लाईन मध्ये थांबावे लागत असल्याने अशा व्यवस्थेचा रुग्णांना जास्त त्रास होत आहे असे आम आदमी पक्षाचे डॉ. अभिजीत मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तसेच 2016 मध्ये माननीय पंतप्रधान यांनी नोटबंदी करून सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश दिले होते, परंतु पुणे महानगरपालिके मध्ये भाजपचे 100 नगरसेवक असताना देखील या निर्देशांना केराची टोपली दाखवली गेली. गेल्या आठ वर्षाच्या काळात शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पैसे घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याचे दिसून येते. या उलट रुग्णांनाच दवाखान्यात देण्याकरिता सुट्टे पैसे घेऊन यावे अशा प्रकारची पाटी लावल्याचे दिसते. या सर्व प्रकारावर भाजपा च्या १०० पैकी एकाही नगरसेवकाने आवाज उठवला नसून, महापालिकेच्या रुग्णालयात कदाचित उपचार घेत नसल्यानेच त्यांना ही गोष्ट गरजेची वाटली नसेल आणि त्यामुळेच असा प्रकार घडला आहे असा आरोप यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने केला गेला.

आम आदमी पक्षाच्या वतीने निवेदन देण्याकरिता डॉ.अभिजीत मोरे, ॲड.अमोल काळे, आरती करंजावणे, ऋषिकेश मारणे व सुधीर कुलकर्णी हे उपस्थित होते.

See also  खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नियुक्तीनंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून "अभिवादन यात्रा"