तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त ‘धम्मपहाट’ व ‘धम्मसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेला ‘धम्मपहाट’ व संध्याकाळी ‘धम्मसंध्या’ या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा धम्मपहाट कार्यक्रमाचे 19 वे वर्षे आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

पुढे बोलताना वाडेकर म्हणाले, येत्या गुरुवार दि.२३ रोजी बुद्ध जयंती निमित्त पहाटे ५ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे ‘धम्मपहाट’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायक प्रतिक जाधव, पार्श्वगायिका सोनाली सोनवणे, ‘इंडियन आयडॉल फेम’ प्रतिक सोळसे, पार्श्वगायिका कोमल धांडे, दर्शन साटम, ‘सारेगम फेम’ प्रतिक बावडेकर आदी धम्मगीते  सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यावेळी त्यांना विशेष सन्मानाने देखील सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी भंते नागघोष (पुणे), भंते हान (व्हिएतनाम), भंते संघदूता (अरुणाचल प्रदेश), भंते धम्मानंद (पुणे) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एसओएसए  युनिव्हार्सिटी ऑफ लंडन येथील रिसर्चर अभिषेक भोसले उपस्थित राहणार आहेत. तसेच याप्रसंगी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादीत केलेल्या वृषाली संतराम कांबळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

याच दिवशी  ‘धम्मसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन सायं ६ वा. तथागत गौतम बुद्ध विहार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, जनरल जोशी प्रवेशद्वारा शेजारी, पुणे येथे होणार आहे. यामध्ये ‘माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं ..’ फेम ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांचा स्वराविष्कार आणि ‘इंडियन आयडॉल व सुर नवा ध्यास नवा फेम’ संतोष जोंधळे यांचा लाईव्ह कॉन्सर्ट उपस्थितांना अनुभवायला मिळेल. यावेळी सामुहिक धम्मवंदना व खिरदान कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे, असे वाडेकर यांनी सांगितले.

See also  ते पोलिस स्टेशन आहे, तुमच्या घरचा डायनिंग टेबल नाही ! खासदार सुप्रिया सुळेंचा लोहगांवमध्ये स्थानिक आमदारांवर जोरदार प्रहार,