सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जयकर मित्र परिवाराचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर अभ्यासिकेच्या जयकर मित्र परिवाराच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक 28 जुलै रोजी विद्यापीठ परिसरात उत्साहात पार पडला. जयकर ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून शासकीय, राजकीय,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर्स, वकील,व्यावसायिक, उद्योजक, प्राध्यापक आदी  क्षेत्रात कार्यरत असलेल्या सत्तरहून अधिक मित्रांचा अनेक वर्षानंतर विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.

भौतिकशास्त्र विभागाच्या सी.व्ही. रमण हॉलमध्ये हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये 1986 सालापासूनच्या  जयकर ग्रंथालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांधकाम व्यावसायिक  कृष्णा कुडूक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भास्कर घोडके यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विठ्ठल गायकवाड, ढोणे पाटील डी.एड. कॉलेज पुणे हे उपस्थित होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब नागवे सहाय्यक आयुक्त आयकर विभाग मुंबई, सचिन खोमणे वरिष्ठ लेखापरीक्षक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई, आनंद भोसले सहाय्यक आयुक्त कामगार विभाग मुंबई, दिनेश साबळे समाज कल्याण अधिकारी पुणे, सोपान सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त  विक्री कर विभाग मुंबई, योगेंद्रसिंह शितोळे आर.टी.ओ. पनवेल, सूरज कुसळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच महसूल, पोलिस, सरकारी विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक उपस्थितांनी आपल्या विद्यापीठातील अनुभवांचे कथन केले.आपल्या जडणघडणीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहुमोल वाटा असल्याचं प्रत्येकाने मत व्यक्त करतानाच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबद्दल  कृतज्ञता भाव देखील व्यक्त केला. तसेच अशा प्रकारचं स्नेहसंमेलन दरवर्षी आयोजित केलं जावं आणि त्या माध्यमातून विद्यापीठातील स्पर्धा परीक्षेचा आणि इतर विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आपल्याकडून मदत व्हावी अशी इच्छा देखील काहींनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतिहास विभागातील सहयोगी प्रा.डॉ.बाबासाहेब दूधभाते यांनी देखील अशा प्रकारच्या स्नेह मेळाव्यासाठी विद्यापीठाकडून आपणाला वेळोवेळी सहकार्य केले जाईल अशा प्रकारची ग्वाही दिली.

See also  पुणेकर नागरिकांच्या सहकार्याने जी-२० बैठक यशस्वी करू - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

तसेच, यावर्षी विद्यापीठाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) या संस्थेच्या वतीने होणाऱ्या मूल्यांकनामध्ये ह्या स्नेह मेळाव्याचे  विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून आपण विद्यापीठ प्रशासनाकडे दखल घेण्यासाठी विनंती करू अशी भावना व्यक्त केली. प्रा. भास्कर घोडके  यांनी येथून पुढे दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून हा स्नेह मेळावा आयोजित केला जावा आणि त्यानिमित्ताने विद्यापीठांमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपणासारखे सामाजिक कार्यक्रम देखील केले जावेत असा विचार मांडला. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ग्रामविकास अधिकारी श्री वसंत पवार, तसेच बांधकाम व्यावसायिक कृष्णा कुडूक आणि प्रा. भास्कर घोडके,समाजकल्याण अधिकारी दिनेश साबळे, अविनाश जवळकर आदींनी मोलाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ.बाळासाहेब सोनवणे आंबेडकर कॉलेज पुणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय ढोले यांनी हॉल  उपलब्ध करून दिला, व  कार्यक्रमाच्या मदतीसाठी संदीप भुजबळ, साळुंखे, तसेच मानव विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.प्रभाकर देसाई तसेच प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.विजय खरे यांचे विशेष सहकार्य लाभले.