बाणेर : बाणेर येथील किया शोरूम जवळील बीट वाईज चौका जवळ वाहतूक कोंडी होत असताना नेमण्यात आलेले वॉर्डन मात्र एका बाजूला उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी पाहण्याचे काम करत होते. यावेळी एका नागरिकाने त्यांना जाब विचारला असता त्यांचा मोबाईल हिसकावून घेत नागरिकांना दमबाजी करण्यात आली.
समस्त ग्रामस्थ बाणेर महामार्गावरील असे पुलावर लिहिलेल्या किया शोरूम जवळील सर्विस रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी नित्याची बाब झाली आहे. गाजावाजा करत या ठिकाणी बसवण्यात आलेले सिग्नल सातत्याने बंद असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे.
परंतु वॉर्डन जागेवर न थांबता बाजूला थांबत असल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वॉर्डनला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येत नसल्याचे पाहून एका सजक नागरिकाने त्यांना विचारणा केली.
यावेळी उद्धट वॉर्डनने पगार मिळत नसल्यामुळे काम करत नसल्याचे सांगत नागरिकाच्या हातातील मोबाईल काढून घेतला. या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते. सिग्नल व्यवस्था बंद असते वाहतूक समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात तसेच काम न करणाऱ्या वॉर्डन वर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.