जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार

पुणे: पुण्यनगरीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उपनगरात भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ वाढवावी, या माजी महापौर सुनिता वाडेकर यांच्या विनंतीला मान देऊन संत तुकाराम महाराज संस्थानाने तत्काळ ही वेळ 25 मिनिटे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपनगरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भक्तिभाव, समर्पण आणि चैतन्याचे निधान असलेला पालखी सोहळा हा भाविकांसाठी आनंदाचा सोहळा असतो. पायी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच पालखी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणचा परिसर भक्तिरंगात रंगून निघतो.

पुण्यात मुक्काम करणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ अत्यल्प असल्याने पालखीच्या दर्शनाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनेक भाविकांचा हिरमोड होत असे. त्यांची अडचण लक्षात घेऊन माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी विसाव्याची वेळ वाढवण्याची विनंती संस्थानाचे अध्यक्ष ह भ प जालिंदर महाराज मोरे यांच्याकडे केली. त्याला त्वरित प्रतिसाद देऊन ही वेळ 25 मिनिटांपर्यंत वाढवित असल्याची ग्वाही ह भ प मोरे महाराज यांनी दिली. त्यामुळे विशेषतः खडकी, औंध, बोपोडी, बाणेर, रेंज हिल्स या उपनगरातील भाविकांना शांतपणे पालखीचे दर्शन घेता येणार आहे. संस्थानाच्या या निर्णयामुळे या परिसरातील भाविकांमध्ये समाधानाची भावना आहे.

या भाविकांसाठी प्रयत्न करणाऱ्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर, अविनाश कदम, ऍड ज्ञानेश जावीर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

See also  पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे