बाणेर : बाणेर येथे रविवारी खासदार जनसंपर्क सेवा अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाच्या प्रसिद्धीसाठी पाषाण बाणेर बालेवाडी सुस रोड परिसरात मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आले आहे.
या अनधिकृत बॅनरबाजी मुळे फुटपाथ, बस स्टॉप तसेच दुभाजकाचे देखील विद्रूपीकरण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून बस थांब्यावरील नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे.
खासदार जनसंपर्क सेवा अभियान हे नागरिकांच्या सेवेसाठी आहे की इच्छुक उमेदवारांची जाहिरात करण्यासाठी असा प्रश्न या बॅनरबाजीमुळे उपस्थित होऊ लागला आहे. अनाधिकृत बॅनरवर एरवी पुणे महानगरपालिकेकडून तत्काळ कारवाई होते. परंतु खासदारांच्या अभियानाच्या बॅनरवर पुणे महानगरपालिका कारवाई करणार का? की शहराच्या विद्रूपीकरणाचा प्रश्न या सेवा अभियानातच नागरिकांना मांडावा लागेल?
खासदार जनसंपर्क सेवा अभियान यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न सुटणार असले तरी कार्यकर्त्यांच्या उत्साही बॅनरबाजीमुळे निर्माण झालेला प्रश्न देखील सोडवण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.





















