बॅरिस्टर ते बारमालक नेतृत्वाचा बदलता प्रवास – ( मुन्ना इंगळे)

स्वातंत्र्यपूर्व काळात बॅरिस्टर महात्मा गांधी, बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅ. पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या विद्वान नेत्यांनी देशाला परकीय राजवटीतून मुक्त करून समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी थोर कार्य केले. सुभाषबाबू हे तर आय ची एस होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतल्यामुळे बॅरिस्टर चा अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडावा लागला.

स्वातंत्र्योत्तर काळात कायद्याची पदवी असणाऱ्यां नेत्यांची संख्या खूप होती. सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, पी. चितम्बरम, अरुण जेटली यांसारखे अनेक नेते कायद्याचे पदवीधारक होते. काळ सरकत गेला आणि कुस्तीगीरांनी राजकारणात आपला जम बसवला; त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांच्यापासून अनेकांनी राजकीयआखाड्यात आपले डाव आजमावून काही काळ राजकारणावर आपली हुकूमत गाजवली. मधल्या काळात साहित्यिक आणि कलाकार मंडळींनीही समाजावर प्रभाव टाकला. प्रा. प्र. के. अत्रे यांच्या लेखणीने आणि वकृत्वाने देश ढवळून निघाला होता. त्यांच्या वाणीने आणि अग्रलेखाने समाजमनांत नवचैतन्याचे निखारे फुलत होते.

बाळासाहेब ठाकरे हे तर व्यंगाच्या फटकार्यानेच दुश्:प्रवृत्तींना घायाळ करीत होते; त्यांच्या पुण्याईमुळे समाजातील दगडांनाही शेंदूर लागून त्यांचे आयुष्यच्याआयुष्य सोन्यासारखे उजळले. फारमोठी पक्षबांधणी त्यांनी कलेच्या आणि वाणीच्या माध्यमातून केली. दादा कोंडके, एम.जी. रामचंद्रन, एन.टी. रामाराव, जे. जयललिता, सुनील दत्त यांसारख्या दिग्गजांनीही ह्या क्षेत्रात कायस्वरूपी प्रभाव पाडला होता. व्यावसायिक डॉक्टर मंडळीनां रुग्ण संपर्काचा आयताच फायदा होतं होता परंतु शिखरावर पाय रोवण्यात त्यांची पिछेहाटच होत होती. प्राध्यापकवर्गही समाजसेवेत मागे नव्हताच. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन, डॉ. मनमोहन सिंग, गोपीनाथराव मुंडे, प्रा. प्रमोद महाजन यांसारख्या प्राध्यापक असलेल्या विद्वानांनीही समाजाचा हा रामरथ हाकण्याचे पुण्यकर्म केले. विध्येचा, कलेचा आणि कुस्तीचा हा प्रांत हळूहळू मदिरालयांच्या (बारवाल्यांच्या) दावणीला कधी बांधला गेला? लोकशाहीच्या मंदिराच्या चाव्या ढाब्यावरच्या भाऊगर्दीत हरवल्या की काय?

विद्वानांच्या फळीपासून बारमालकांच्या टोळीपर्यंतचा हा प्रवास कधी आणि कुठून सुरु झाला? सुज्ञ जनतेच्या नजरेतुन हा प्रश्न सुटलेले नाही. बहुसंख्य बारमालकच आता ह्या रामरथाच्या पुढे फेर धरून झिंगताना दिसत आहेत. कायद्याच्या विद्यार्थ्यांची जागा आता मद्याच्या ग्लासांनी भरली आहे की काय? असा विचार नागरिकांच्या मनात वेगाने रुंजी घालू लागला आहे.

See also  रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

–  मुन्ना इंगळे ९८२३११७४११