कोथरूड : सर्व्हे नंबर ४४ केळेवाडी मधून जाणारा बालभारती ते पौड फाटा प्रस्तावित रोड च्या टी.डी.आर. मध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांची जयराम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे राहुल वांजळे सहकार्यांसह भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी सचिन यादव, उमेश मिसाळ, निलेश सोनटक्के, विनोद शिवणकर, तेजस भगत, समीर निवंगुणे, दीपक गावडे आदी उपस्थित होते.
कुमार प्रॉपर्टीच्या माध्यमातून टीडीआर घोटाळा केला जात आहे. एस आर ए करणारे सी न्यू डेव्हलपर हे वेगळे आहेत. हा रस्ता श्री जयराम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेतून जात असून रस्त्याचा टीडीआर हा कुमार प्रॉपर्टीजला देण्यासाठी पथविभागाच्या वतीने डी पी आर तयार करण्यात आला आहे. जागा कुमार प्रॉपर्टीज नसताना देखील डीपीआर कसा तयार करण्यात आला याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
माहिती अधिकारात माहिती विचारली असता पथविभाग व मालमत्ता व्यवस्थापन विभाग माहिती देण्यास टाळाटाळ करत असून सदर माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली.
यावेळी नागरिकांना पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सदर प्रकरण व्यवस्थित समजून घेऊन, चौकशी करून कारवाई करणेबाबत ठोस आश्वासन दिले.
यावेळी राहुल वांजळे म्हणाले, कायदेशीर प्रक्रियेनुसार कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत पुणे महानगरपालिका बांधकाम व्यवसायिकांना टीडीआर देण्याचा घाट घालत आहे. एस आर ए प्रकल्प हस्तांतरण करत असताना देखील अनेक त्रुटी करण्यात आले आहेत. एस आर ए प्रकल्प पूर्ण नसताना देखील टीडीआर देण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे ही जागा श्री जयराम गृहनिर्माण संस्थेचे आहे. परंतु अधिकाऱ्यांनी डीपीआर हा कुमार प्रॉपर्टीज साठी तयार केला आहे ही बाब आम्ही आयुक्तांसमोर मांडली आहे.

























