औंध : पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात २००२ साली सयाजीराव गायकवाड उद्योग भवन व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिरची पायाभरणी केली होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण २०१३ साली माजी नगरसेविका संगीता दत्तात्रय गायकवाड यांच्या कार्यकाळात पार पडले.
दूरदृष्टी ठेवून उभारण्यात आलेल्या या इमारतीमुळे औंध परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या शासकीय व प्रशासकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. गावालगतच दिमाखात उभे असलेले हे उद्योग भवन आज औंध परिसरासाठी ‘मिनी महानगरपालिका’ म्हणून ओळखले जाते.
या उद्योग भवनात क्षेत्रीय कार्यालय, पीएमआरडीए कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सिटी पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र शासन अमृत योजना कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र अशी विविध प्रशासकीय कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे औंध परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसाठी दूरवर जावे लागण्याची गरज उरलेली नाही.
महानगरपालिकेचे कार्यालय जवळच उपलब्ध झाल्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन तसेच इतर प्राथमिक नागरी समस्यांसाठी तक्रार नोंदवणे सुलभ झाले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय टळून गावालगतच प्रभावी तक्रार निवारण केंद्र उपलब्ध झाले आहे.
याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिरामुळे औंध परिसरातील सांस्कृतिक जीवनाला नवे बळ मिळाले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली, नाट्यप्रयोग यांच्यासह परिसरातील अनेक शाळांचे स्नेहसंमेलने याच कला मंदिरात होत आहेत. त्यामुळे औंध परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची एक प्रकारची मेजवानीच मिळत आहे.
औंधच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घालणारे सयाजीराव गायकवाड उद्योग भवन व पंडित भीमसेन जोशी कला मंदिर हे आजही दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचे उत्तम उदाहरण ठरत आहेत.
























