पुणे डबल डेकर पूल व मेट्रो कामांची उच्चस्तरीय पाहणी

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल आणि माण–हिंजवडी मेट्रो मार्गिका (लाइन–३) अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तर्फे सखोल पाहणी करण्यात आली.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन या प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणे महानगरपालिका तसेच पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान डबल डेकर पूलच्या कामाचा दर्जा, सद्यस्थितीतील प्रगती आणि ठरवलेले वेळापत्रक यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित यंत्रणांना कामाचा दर्जा अबाधित ठेवत, निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. दरम्यान, बानेर रॅम्प प्रकल्पाबाबत टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री वापरून कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून हा रॅम्प लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल करता येईल. तसेच, पुणे महानगरपालिकेच्या अभियंत्यांना लीकेज झालेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे डबल डेकर पूल प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले.

याशिवाय, माण–हिंजवडी मेट्रो मार्गिका (लाइन–३) अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचीही पाहणी करण्यात आली. मेट्रो स्थानकांशी संबंधित अडचणी, तांत्रिक अडथळे आणि प्रगतीचा आढावा घेत तातडीच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. डबल डेकर पूल आणि मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून पुणेकरांच्या वाहतूक सुविधा अधिक सक्षम, सुलभ आणि सुरक्षित करण्याचे नियोजन पीएमआरडीएने केले आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

See also  गरिबीला लाजू नका; शिक्षणात खंड पडू देऊ नका, सावित्री फोरमचेच्या कार्यक्रमात आदर्श शिक्षिका स्वाती वानखडे यांचे आवाहन