करदात्यांची काळजी आणि विकसित भारताचा संकल्प – ना. चंद्रकांतदादा पाटील

नवी दिल्ली / पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजप नेते ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा अर्थसंकल्प असून, शहरीकरण, उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती यांना विशेष चालना देणाऱ्या ठोस तरतुदी यात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी तब्बल १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली असून, त्यामुळे देशाच्या आर्थिक वृद्धीला गती मिळणार आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय व सिंचन या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘लखपती दीदी’ योजना यशस्वी ठरल्याने महिलांसाठी नव्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स व उद्योगांच्या संधी निर्माण करणाऱ्या योजनांमुळे महिला उद्योजकतेला बळ मिळणार आहे.
शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, देशातील प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना राबवली जाणार आहे. उच्च शिक्षणातील गुंतवणुकीतून नवी शैक्षणिक संस्थाने, विद्यापीठ टाउनशिप आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जाणार आहे.आरोग्य क्षेत्रात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात प्रगत चिकित्सा व्यवस्था उभारण्याचा निर्णय हा मैलाचा दगड ठरेल, असेही पाटील यांनी नमूद केले.

तसेच मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपी वाढीस मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक ग्रोथ हबसाठी दर पाच वर्षांत ५,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, याचा लाभ मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, नागपूरसह देशातील अनेक महानगरांना होणार आहे.
एकूणच भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने पुढे नेणारा आणि देशवासीयांचे जीवनमान उंचावणारा हा अर्थसंकल्प असल्याचे नमूद करत, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले.

See also  कार्यसम्राट मोफत महा- आरोग्य शिबीराची जय्यत तयारी आज उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती