अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : अन्नपदार्थ ऑनलाइन पद्धतीने पुरविणाऱ्या कंपन्यांच्या गोदामांची तातडीने विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) विधानसभेत बोलताना केली.

ऑनलाइन पद्धतीने मागविलेले अन्नपदार्थ काहीवेळा टिकाऊपणाची मुदत संपल्यावरही मिळतात, अशी तक्रार पुणे आणि अन्य शहरांमधील ग्राहकांकडून केली जात आहे. २००६ सालच्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार मुदत संपलेले अन्नपदार्थ विकणे हा गंभीर गुन्हा आहे. असे अन्नपदार्थ पुरविलेल्या किती कंपन्यांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत? अशी विचारणा आमदार शिरोळे यांनी केली.

ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांमधील साठवणूक आणि त्यांची वेळोवेळी होणारी तपासणी यातच त्रुटी असल्याने आरोग्यास घातक असे प्रकार घडत आहेत. पुणे विभागातील ब्लिंकीट, स्विगी, झिप्टो अशा कंपन्यांच्या गोदामांची (डार्क स्टोअर्स) राज्य सरकारच्या अन्न, औषध प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांत किती वेळा तपासणी केली? मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवण्याच्या प्रकरणात संबंधित कंपन्या आणि व्यवस्थापनावर कोणते गुन्हे दाखल केले आहेत? असाही प्रश्न आमदार शिरोळे यांनी विचारला.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आमदार शिरोळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेतली. राज्यात विभागवार आमदारांच्या बैठका घेऊ. त्या बैठकीत उपाययोजनांबाबत विचार करू, केंद्र सरकारचीही यात मदत घेऊ, असे उत्तर मंत्री झिरवळ यांनी त्या प्रश्नाला दिले.

See also  सिद्धार्थ शिरोळे यांना औंध भागातील युवकांचा वाढता पाठिंबा, विविध मंडळातील कार्यकर्त्यांशी,  नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी