बालेवाडीमध्ये अनधिकृत केबलचा कहर! विजेचे खांब वाकले, दिवे कोसळले — पुणे महापालिकेला कोट्यवधींचा फटका

पुणे : बालेवाडी परिसरात अनधिकृत केबल टाकण्याच्या बेकायदेशीर प्रकारामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे. विजेच्या खांबांवर नियमबाह्य पद्धतीने टाकलेल्या केबलमुळे अनेक खांब वाकले असून काही ठिकाणी रस्त्यावरील दिवे थेट जमिनीवर कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, केबल ऑपरेटरकडून कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे विजेच्या खांबांचा वापर केला जात आहे. यामुळे खांबांवर अतिरिक्त भार पडून ते धोकादायक स्थितीत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, पावसाळा तोंडावर असताना ही परिस्थिती अधिकच भयावह ठरू शकते.

अपघाताचा मोठा धोका
वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या केबल्समुळे पादचारी व वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

महानगरपालिकेला कोट्यवधींचा तोटा
अनधिकृत केबलमुळे केवळ पायाभूत सुविधांचे नुकसान होत नाही, तर पुणे महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडत आहे. नियमबाह्य जोडण्यांमुळे अधिकृत परवाना शुल्क टाळले जात असून यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती समोर येत आहे.

या संपूर्ण प्रकारावर तातडीने कठोर कारवाई करावी, अनधिकृत केबल्स हटवाव्यात आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. पुणे महानगरपालिका या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का? की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

See also  पुणे महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मनसेची आयुक्तांकडे मागणी