राम नदीत पुन्हा दूषित पाण्याचा विसर्ग सुरूच; आयुक्तांच्या पाहणीनंतरही परिस्थिती जैसे थे

पुणे : पाषाण तलाव परिसरात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होऊन मासे मृत झाल्याची गंभीर घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्तांनी राम नदी व तलाव परिसराची पाहणी करत तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले होते. मात्र, या पाहणीनंतरही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचे समोर आले आहे.

राम नदी पात्रामध्ये अनेक ठिकाणी दूषित पाणी सातत्याने मिसळत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या ड्रेनेज लाईनमधूनच मैलायुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. नुकत्याच उभारण्यात आलेल्या एसटीपी प्लांटला जोडणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या शेजारील चेंबरमधूनच अशुद्ध पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणले आहे. पाषाण सोमेश्वर वाडी परिसरामध्ये राम नदी पात्रात ड्रेनेज लाईनचे मैलायुक्त दूषितपाणी सोडले जात आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.

या प्रकारामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता घसरत असून जलचरांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. पाषाण तलावातील माशांच्या मृत्यूनंतरही अशीच परिस्थिती कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

केवळ पाहणीपुरते न थांबता प्रत्यक्षात दोषी यंत्रणा बंद करून प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. राम नदी व पाषाण तलावाचे संवर्धन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने तातडीने ठोस पावले उचलावीत, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

See also  देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे स्वागत करण्याजोगे आम आदमी पार्टी