शहारात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा – सुनील माने ; बोपोडीत मध्यरात्री सशस्त्र चंदनचोरी

औंध ता. २९ (प्रतिनिधि) : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. औंध -बोपोडी भागातील अतिशय प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या शांतानिकेतन सोसायटीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री, सशस्त्र प्रवेश करत येथील चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून चोरून नेले. या घटनेने नागरिक भयभीत झाले असून या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय चिंताजनक बनत चालली आहे. अनेक ठिकाणी दिवसा गुन्हे होत आहेत. शुक्रवारी (दि. २९) पहाटे औंध बोपोडी भागातील अतिशय प्रतिष्ठित असलेल्या शांतानिकेतन सोसायटीत पहाटे २ ते ३ च्या दरम्यान कोयते, कुऱ्हाडी, तलवारी, चाकू या स्वरूपाची घातक शस्त्रे त्यांच्याकडे होती. ही सोसायटी या भागातील प्रमुख निवासी सोसायट्यांपैकी एक आहे. सोसायटीच्या शेजारी आय.टी. पार्क तसेच सभोवताली अनेक निवासी सोसायट्या असून हा भाग दाट लोकवस्तीचा बनला आहे. अशा निवासी वस्तीत गुन्हेगार मध्यरात्रीच्या वेळी निर्धास्तपणे सोसायटीमध्ये प्रवेश करून कोणत्याही भीतीशिवाय चोरी करत आहेत हे चिंताजनक आहे.

पोलिस रात्री गस्त घालत नाहीत. पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुसरून, पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी पोलिसांची रात्रीची गस्त शहरात कमी झाली की काय अशी परिस्थिती आहे. लोक चिंताग्रस्त आहेत. या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम मा. पोलिस आयुक्तांनी तातडीने हाती घेतले पाहिजे. पोलिसांची जरब बसवली पाहिजे. चोरी, खून यासारख्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले पाहिजे अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे.

See also  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे विनम्र अभिवादन