नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर टेकडीवर ५१ वृक्षांचे वृक्षारोपण

पुणे, दि. ११ जून : नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर टेकडी येथे ५१ वृक्ष लागवडीचा भव्य उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वसुंधरा अभियानाचे श्री. पांडुरंग भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेत वृक्ष लागवड केली. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन पाषाणकर, श्री. अनिकेत चांदेरे, श्री. प्रतिक साबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी औंध-बाणेर प्रभाग समितीच्या अध्यक्षा तथा पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. रोहिणी सुधीर चिमटे यांनी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वृक्षसंवर्धन उपक्रमांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वृक्षसंवर्धनासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि हिरवागार प्रभाग घडविण्यासाठी आपण नेहमीच पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितले.

“वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ, निरोगी आणि समृद्ध पर्यावरण देण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाची ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

See also  प्रभाग क्र. ९ मध्ये शिवसेना उमेदवार मयूर भांडे यांची जोरदार पदयात्रा; नागरिकांशी थेट संवाद