पुणे, दि. १४ जून २०२६ : बावधन येथील Aura Ville गृह निर्माण संस्थेमध्ये उभारण्यात आलेल्या 30 किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन माजी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री राहुलजी नरुटे, सेक्रेटरी श्री राजेंद्रजी मारणे, खजिनदार श्री अधीरजी तसेच कमिटी सदस्य श्री अमोलजी आणि श्री सुयशजी पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिलीप वेडे पाटील यांनी सौर ऊर्जा प्रकल्प हे पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पाऊल असल्याचे सांगितले. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून गृह निर्माण संस्थांचे सक्षमीकरण होत असून वीज खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान देखील अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, पुणे महानगरपालिका मार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये ५ टक्के सवलत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. बावधन परिसरातील इतर गृह निर्माण संस्थांनी देखील पुढाकार घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
परिसराच्या विकासाबाबत बोलताना वेडे पाटील यांनी बावधनमधील सुसज्ज रस्ते, नव्याने समाविष्ट झालेल्या भागांसाठी पाणीपुरवठ्याच्या तीन टाक्यांचे नियोजन तसेच नागरिकांना महानगरपालिकेच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सोसायट्यांनीही सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर अधिक विकसित व सुस्थितीत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या उद्घाटन कार्यक्रमास Aura Ville गृह निर्माण संस्थेचे पदाधिकारी, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रोहन इनामदार यांनी सोसायटीच्या पाणी व्यवस्थापना संदर्भात असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली.हा सौर ऊर्जा प्रकल्प सूर्या टेक सोलर यांच्या वतीने उभारण्यात आला असून, सोसायटीतील सर्व सभासदांनी वर्गणीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या पर्यावरणपूरक उपक्रमाला हातभार लावला. या प्रकल्पामुळे सोसायटीच्या वीज खर्चात बचत होण्यास मदत होणार असून, स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.
या उपक्रमामुळे Aura Ville सोसायटीने शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून, भविष्यात इतर गृहनिर्माण संस्थांसाठीही हा प्रकल्प प्रेरणादायी ठरणार आहे.

















