११ शस्त्रक्रियांनंतरही जिद्दीचा विजय; मुळशीच्या गीता मालुसरेने सर केले इंग्लिश चॅनेल

पुणे, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर मुळशीची जलतरणपटू गीता दीपा महेश मालुसरे हिने जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनेलवर यशस्वी मोहोर उमटवली आहे. २७ जून २०२६ रोजी गीताने समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि प्रचंड लाटांचा सामना करत तब्बल १४ तास ३१ मिनिटांत ५४ किलोमीटर अंतर पोहत पूर्ण केले. इंग्लिश चॅनेलचे सरळ अंतर सुमारे ३५ किलोमीटर असले, तरी समुद्रातील प्रवाह आणि लाटांमुळे प्रत्यक्षात तिला ५४ किलोमीटर पोहावे लागले.

ही मोहीम इंग्लिश चॅनेल स्विमिंग असोसिएशनच्या अधिकृत देखरेखीखाली पार पडली. गीता सध्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शेखर खासनीस आणि प्रतिक जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

मुळशीची सुवर्णकन्या म्हणून ओळख असलेल्या गीताचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. अवघ्या तिसऱ्या वर्षी पोहण्यास सुरुवात केलेल्या गीताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१७ मध्ये केवळ १३ व्या वर्षी मुंबईच्या समुद्रात ३२ किलोमीटर अंतर अवघ्या ६ तास २६ मिनिटांत पोहून तिने विक्रम केला होता.

मात्र तिच्या कारकिर्दीत अनेक कठीण प्रसंग आले. २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे दोन वर्षे सराव बंद राहिला. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये रत्नागिरीतील सागरी स्पर्धेदरम्यान विषारी जेलीफिशच्या दंशामुळे तिच्या हातावर गंभीर परिणाम झाला. एका वर्षात तब्बल ११ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. हात निकामी होण्याची भीती निर्माण झाली होती आणि तिचे जलतरण करिअर संपल्याची चर्चा सुरू झाली होती.

वेदनांवर मात करत इतिहास

या सर्व संकटांनंतरही गीताने हार मानली नाही. गेल्या वर्षभरात तिने दररोज आठ ते दहा तास सराव केला. हातावरील जखमा पूर्ण भरल्या नसतानाही आणि वेदना सहन करत तिने सराव सुरू ठेवला. इंग्लिश चॅनेल पार करतानाही जुन्या जखमांचा त्रास जाणवत होता. तसेच इंग्लंडमध्ये सरावादरम्यान पुन्हा एकदा जेलीफिशचा दंश झाला होता. मात्र या सर्व अडचणींवर मात करत तिने अखेर इंग्लिश चॅनेल यशस्वीरीत्या पार करून इतिहास घडवला.

See also  केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ‘आरोग्यवारी अभियाना’चा शुभारंभ

क्वीन ऑफ ओशन’ हे पुढील लक्ष्य
इंग्लिश चॅनेल हे गीताच्या महत्त्वाकांक्षी ‘क्वीन ऑफ ओशन’ मोहिमेतील पहिले मोठे पाऊल आहे. जगातील सात प्रमुख महासागरीय खाड्या पोहून पूर्ण करण्याचे तिचे ध्येय आहे. यंदाच ऑगस्टमध्ये न्यूयॉर्क येथील ट्वेंटी ब्रिजेस स्पर्धा आणि सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियातील कॅटालिना चॅनेल पार करण्याचा तिचा मानस आहे.

वडिलांची भावना
गीताचे वडील महेश मालुसरे म्हणाले, “ध्येय गाठण्यासाठी गीताने वेदनांनाही मागे टाकले. ज्या जलतरणामुळे तिचा हात गमावण्याची वेळ आली होती, त्याच क्षेत्रात ‘सेव्हन ओशन चॅलेंज’ पूर्ण करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे. हातातून रक्त येत असतानाही तिने सराव सोडला नाही. तिची जिद्द, सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा मला वडील म्हणून अभिमान आहे.”