सेवाकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्या : चंद्रकांत पाटील ; संत अच्युत महाराज गुरुपौर्णिमा उत्सव

पुणे : महाराष्ट्रातील साडेतीन कोटी जनता थेट अध्यात्माशी जुळली आहे. या सर्वांनी मनुष्याची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा समजून प्रत्येक मनुष्यातला परमेश्वर ओळखावा आणि सेवा कार्याला प्राधान्य द्यावे. श्री संत अच्युत महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठानने सुद्धा त्यासाठी पुढाकार घ्यावा. त्या कार्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

श्री संत अच्युत महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने रविवारी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, औंध येथे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात ते बोलत होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व श्री संत अच्युत महाराजांच्या प्रतिमेचे, पादुकांचे पूजन संत सचिन देव महाराज, मंत्री चंद्रकांत पाटील, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे क्षेत्रीय अधिकारी सुशील जाधव, श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ. श्रीकांत देशमुख, शुभदा पोतदार यांनी केले. उत्सवात आवर्जून आलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांचा भावपूर्ण सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज वाडेकर यांनी केला. अनंत खासबारदार यांनी तयार केलेल्या प्रतिष्ठानच्या प्रतीकचिन्हाचे विमोचन व प्रतिष्ठानचे सचिव अभिलाष बेंडे यांनी तयार केलेल्या संकेतस्थळाचा शुभारंभ मान्यवरांच्याहस्ते झाला. याचवेळी श्री संत अच्युत महाराज सांस्कृतिक प्रतिष्ठानची पहिली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

आशीर्वाचनात संत सचिन देव महाराज म्हणाले, वैदर्भीय संतांचा नावलौकिक जगात आहे. घराघरातला जिव्हाळा कायम ठेवायचा असेल तर संतांचे उपदेश आत्मसात करा. आजच्या तरुणांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक आहे. पण, त्यांनी अंतःकरण आध्यात्मिकच ठेवले पाहिजे.

तत्पूर्वी भाजयुमो प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक, डेक्कन एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणी सदस्य उमा गाडगीळ, भाजपचे सचिन पाषाणकर यांच्यासह अन्य मान्यवर मंडळीचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. अंजली व यश खेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्तीगीतांचे गायन केले. प्रास्ताविक दीप्ती पोतदार, संचालन ज्योती चांदुरे, आभार नीता पोखर्णीकर यांनी मानले. अनिरुद्ध गडकरी, अमेय वडोदकर, मुकेश पायघन, दीपक मालखेडे, अर्चना देशपांडे, रागिणी मोकसदार, माधुरी शहाणे यांनी उत्सवाच्या नियोजन केले. उत्सवात भक्त मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

See also  अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी