महाळुंगे : महाळुंगे परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अकरा वर्षीय कै. विराज संदीप पाटोळे याला महाळुंगे परिसरातील सोसायट्यांमधील हजारो नागरिकांनी रस्त्यावर मेणबत्त्या आणि मोबाईलच्या टॉर्च लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध करत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
महाळुंगे गावठाण तसेच व्हीटीपी सोसायटी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखल आणि निसरडेपणा निर्माण होत असून, या रस्त्यांवरून घसरून अनेक नागरिक जखमी झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला.
काही आठवड्यांपूर्वीच महाळुंगे परिसरातील खड्ड्यांच्या समस्येविरोधात नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
विराजच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक एकत्र आले आणि कॅन्डल मार्च काढत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, धोकादायक ठिकाणी उपाययोजना आणि संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याची मागणी केली.
“आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
महापालिका आयुक्तांनी स्वतः महाळुंगे परिसराला भेट देऊन रस्त्यांची पाहणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या कॅन्डल मार्चमध्ये लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
कै. विराज पाटोळे याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विराजला श्रद्धांजली देताना पुन्हा कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
















