पिंपरी-चिंचवडमध्ये ५२ झाडांच्या वृक्षतोडीप्रकरणी कारवाईची मागणी; अधिकाऱ्याचे निलंबन करून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करा; आप युवा आघाडीची मागणी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाच्या शेजारी सुरू असलेल्या ‘सुखवाणी असोसिएट्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स’ यांच्या खासगी प्रकल्पाच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याचे सांगून तब्बल ५२ जुन्या झाडांची वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे.

याबाबत काळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदन सादवून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, वृक्ष संवर्धन विभागातील अधिकारी महेश गारगोटे आणि राजेश वसावे यांनी संबंधित प्रकरणातील झाडांची संख्या व वय कमी दाखवून अहवालात फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वृक्षतोडीस मान्यता देताना वृक्ष प्राधिकरणाची दिशाभूल करण्यात आल्याचा दावाही आपकडून करण्यात आला आहे.

संबंधित बांधकामाला दिलेली परवानगी तपासून अनियमितता आढळल्यास बांधकाम तातडीने थांबवावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच १,०१८ झाडे लावण्यासाठी प्रति झाड १५ हजार रुपये या प्रमाणात १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करावेत आणि कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निष्काळजीपणे किंवा आवश्यक सार्वजनिक सूचना न देता वृक्षतोडीस परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा दावा करत आम आदमी पार्टीने संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाचे पर्यावरणीय गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. वृक्षतोडीला पाठबळ देणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे.

See also  चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आशियाना पार्क बाणेर येथे बैठकीचे आयोजन