दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरव; सेवा संकल्प अभियानांतर्गत ६३० विशेष शिक्षकांचा सन्मान

पुणे : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या विशेष शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ६३० विशेष शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद पुणे आणि बालकल्याण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

दिशा अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात ३७ मनोविकलांग शाळा कार्यरत असून, दिव्यांग विभागांतर्गत अंध प्रवर्गाच्या ८, अस्थिव्यंग प्रवर्गाच्या ५, मूकबधिर प्रवर्गाच्या २० तसेच १ शासकीय शाळा कार्यरत आहेत. या विविध शाळा व कार्यशाळांमधील विशेष शिक्षकांसह शिक्षण विभागातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विशेष शिक्षक अशा एकूण ६३० शिक्षकांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आयुक्त सत्यजित बडे यांनी बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जात आहे. लवकरच इतर प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या पद्धतीनुसार शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला, स्वावलंबनाला आणि उज्ज्वल भवितव्याला आकार देणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरव सोहळा प्रेरणादायी ठरेल. ‘सेवा हीच संकल्पना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण हेच ध्येय’ या भावनेतून कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या योगदानाला या सन्मानामुळे नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे  विशेष शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाले, “दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविताना विशेष शिक्षकांना मोठ्या संयमाने, संवेदनशीलतेने आणि सातत्याने काम करावे लागते. त्यांची समर्पित सेवा ही अभिमानास्पद आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राधाकिसन देवढे यांनी केली. यावेळी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अनिल निंबाळकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती अस्मा बेगम,बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापकीय अधीक्षक अपर्णा पानसे उपस्थित होत्या.

See also  महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ विरोधात निषेध आंदोलन