राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात
‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’ या माहितीपटाने, तर ‘जवाबों का सफर’ या लघुपटाने बाजी मारली. परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या महोत्सवाचे आयोजन केले होते. लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग अशा तीन प्रकारात हा महोत्सव झाला. उत्कृष्ट कृषी पर्यटन (मेघ मल्हार कृषी पर्यटन केंद्र), सेफराॅन हॉलिडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (उत्कृष्ट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम कंपनी) तर कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सगुणा रूरल फाउंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, माजी प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. तत्पूर्वी, ‘डिजिटल युगातील पर्यटन’ या विषयावर झालेला चर्चासत्रात हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र केळशीकर, ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री, टुरिस्ट गाईड राजिंदर कौर जोहाल व डिजिटल मीडिया अभ्यासक ओवी सातपुते यांनी सहभाग घेतला. डॉ. राजीव घोडे यांनी चर्चासत्राचे संचालन केले. प्रसंगी महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशन अध्यक्ष गणेश चप्पलवार, चित्रपट परीक्षक जुनेद इमाम, महोत्सवाचे व्यवस्थापक असीम त्रिभुवन, माध्यम प्रमुख के. अभिजीत, सारंग मोकाटे आदी उपस्थित होते.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, “भारत हा विविधतेत एकतेने नटलेला देश आहे. भारताच्या पर्यटनाचे विविध रूप, छटा लोकांनी पाहिल्या व अनुभवल्या पाहिजेत. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच जगाला भारताच्या पर्यटनाची ओळख व्हावी आणि पर्यटनात नवीन संकल्पना, धोरणे कशी राबवता येतील, यासाठी असे महोत्सव उपयुक्त ठरतात. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण कायमच सर्वाना आकर्षित करत असतात. त्याची जगाला ओळख व्हावी आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांनी भारतात येऊन हे पाहावे, यासाठी प्रोत्साहन मिळेल.”

सुनील लिमये म्हणाले, “पर्यटन क्षेत्र खूप व्यापक आहे. कृषी पर्यटन, वन पर्यटन जनमानसात रुजत आहे. या क्षेत्रात नोकरी, व्यवसायच्याहीची मोठ्या संधी आहेत. त्याकडे आपण डोळसपणे पाहायला हवे. पर्यटन करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. पर्यटनाला जातो, तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे. पर्यटन स्वछंदी जीवनाचा अनुभव घेणे आहे.”

राजेंद्र केळशीकर म्हणाले, “पर्यटनाला जातो, तेथील माणसांशी, वातावरणाशी समरस व्हावे. पर्यटन स्वछंदी जीवनाचा अनुभव देते. जबाबदार पर्यटनाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. भारतात अनेक समृद्ध ठिकाणे आहेत, त्याची माहिती करून देण्याची आवश्यकता आहे. परदेशातील पर्यटनाचे कौतुक करावेच; पण आपल्या इथे पर्यटनाला जाताना नियमांचे पालन करावे.”

नितीन शास्त्री म्हणाले, “पर्यटन अनेक प्रकारे करता येते. देश, जग फिरल्याने आपण समृद्ध होत जातो. भारताला देशप्रेमाचा, इतिहासाचा मोठा वारसा आहे. देशभक्तीचे अर्थात पॅट्रिऑटिक पर्यटन गेल्या काही वर्षांपासून राबविण्याचा प्रयत्न करत आहोत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल माध्यमे तरुणांच्या हाती असल्याने त्यांना देशभक्ती कळावी, यासाठी पॅट्रिऑटिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.”

सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले. गणेश चप्पलवार यांनी आभार मानले.
—————————–
महोत्सवातील विजेते
माहितीपट : यात्रा (प्रथम), कानी-लव्ह फॉर नेचर (द्वितीय), म्युझिकल ऑफ कच्छ (तृतीय), वाईल्ड वाईल्ड पुणे (उत्कृष्ट दिग्दर्शन), बेस्ट अवार्ड्स – लॉस्ट रिव्हर इन नंदी, न्यू अर्थ क्रोनिकल्स व अंतिम सत्य
लघुपट : जवाबों का सफर (प्रथम), नॉक्सीबन असा टेम (द्वितीय), हुप्प्या (तृतीय), सिंधू सागर (उत्कृष्ट दिग्दर्शन)
व्ही-लॉग : ट्वेन्टी डेज व व्हील्स (प्रथम), उज्जेन्टा पॅलेस (द्वितीय)
———————————-

See also  समूह नृत्यातून दिव्यांग मुलांची मनमोहक अदाकारी